मुंबई- आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डी येथील साई संस्थानकडून ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले आहे. हा निधी राज्य सरकार अपूर्ण असलेला निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. राज्य सरकारने आतापर्यंत इतके मोठे कर्ज कुठल्याही संस्थेकडून घेतलेले नाही. एवढे मोठे कर्ज घेण्याची ही पहिलीच वेळ असून, हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही.
निळवंडे प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. या प्रकल्पाचा खर्च हा १२००
कोटी इतका आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डीच्या साई
संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती. साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख
सुरेश हावरे यांनी यावर निर्णय घेत राज्य सरकारला ५०० कोटींचे कर्ज मंजूर केले.
गेल्या १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जाच्या मुद्द्यावर
बैठक झाली होती. त्याचा प्रस्ताव साई संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या
प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी मंजुरी दिली. दोन टप्प्यात हे कर्ज राज्य
सरकारला दिले जाणार आहे. साई संस्थान आणि गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास
महामंडळात याबाबत करार करण्यात आला आहे.
















